बुलडाणा - जळगाव जामोद तालुक्यातील जामोद टुनकी रोडवरील ज्ञानेश्वर वानखडे या शेतकऱ्यांच्या घरालगत असलेल्या गोठ्याला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये ४ म्हशी आणि २ वगार तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही. या आगीत ज्या जनावरांचा मृत्यू झाला आहे, ती जनावरे वानखडे यांचे जावई सुनील पंडित राऊत यांच्या मालकीची आहेत. त्यांचे या आगीमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी आणि तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.