बुलडाणा - जिल्ह्यातील किनगावराजा पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय लोढे याला अकोला लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने गुरुवारी (25 जून) सायंकाळी तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका दाखल गुन्ह्यातील जामिनासाठी 5 हजार रुपयांची लाच लोढे यांनी मागितली होती. त्यापैकी 3 हजार रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले.
किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये जामीन करून गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी लोढे यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे पहिले 3 हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने मान्य केले.
अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलीस उपअधीक्षक एस. एस. मेमाणे, पो.ना, अन्वर खान, संतोष दहीहंडे, अभय बावसकर यांच्या पथकाने 24 जून रोजी पडताळणी करून गुरुवारी 25 जूनच्या सायंकाळी किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये सापळा रचला. यावेळी आरोपी हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बाजीराव लोढे, वय ५३ वर्ष यास तक्रारदाराकडून 3 हजाराची लाच स्वीकारताना ताब्याचे घेण्यात आले.
पुढील तपास बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.