बुलडाणा - राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी 6 जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्याला भेट दिली. कृषिमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, शेतकऱ्यांच्या कुठल्याच आशा-अपेक्षांवर कृषिमंत्र्यांच्या दौरा खरा न उतरल्याने त्यांचा हा दौरा वांझोटा असल्याची टीका करत काँग्रेसकडून त्यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला.
शनिवारी 6 जुलै रोजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये किमान अधिकाऱ्यांची बैठक घेऊन न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जाचे उद्दीष्ट होते ते देखील पूर्ण झाले नाही. बरचे शेतकरी हे पीक कर्जापासून वंचित आहे. त्यातच जून महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती खरडून गेली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांच्या दौऱ्याकडून अपेक्षा होत्या, पण कृषिमंत्री आले आणि नातेवाईक व भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देऊन निघून गेले.
6 जुलै रोजी सायंकाळी बोंडे हे संत नागरी शेगावात पोहचले. याठिकाणी त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. यांनतर खामगाव येथे पोहचल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत, सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम शैलेश शर्मा यांच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर भाजप आमदार ऍड. आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर नातेवाईक सातपुतळे यांच्या घरी त्यांनी स्वागत सत्कार स्वीकारले. यानंतर ते चिखलेकडे रवाना झाले. त्यामुळे हा दौरा संपताच काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील सपकाळ यांनी हा दौरा वांझोटा असल्याची टीका करत कृषिमंत्रीच्या दौऱ्याचा निषेध केला.