बुलडाणा - आमदार झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी शहराचा कायापालट करण्यासाठी विकासनिधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन नगर पालिकेत आयोजित सत्कार समारंभात केले. यानंतर गायकवाड यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला. २८ वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून जनसेवा केली.
नगरपालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतच आमदार झालेले संजय गायकवाड यांचा सत्कार व नगरसेवक पदाचा राजीनामा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम, मुख्याधिकारी वाघमोडे, नगरसेवक मो.सज्जाद, नगरसेवक आकाश दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.
मी आमदार झाल्यामुळे जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सत्ता आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे जिल्ह्याला विकासनिधी आणण्यासाठी अडचण येणार नाही, असे ते म्हणाले. तसेच विकासाची पोकळी भरुन काढण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
लवकरच शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. तसेच यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन कामांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पत्रकार उपस्थित होते.