बुलडाणा- लॉकडाऊन काळात नियमापेक्षा कमी धान्य देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शेगाव तालुक्यातील जलंब गावात ही कारवाई झाली असून हे दुकान कायमस्वरुपी बंद करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
जलंब येथील रेशन धान्य दुकानदार अशोक सावळे यांना 2002 मध्ये स्वस्त धान्याचा परवाना मिळाला. तेव्हापासून गावकऱ्यांना नियमापेक्षा कमी धान्य देऊन 35 ते 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. तर मृत व्यक्तीच्या नावावर तसेच लग्न झाल्याने बाहेर गावी गेलेल्या मुलींच्या नावावर देखील अनेक वर्षांपासून धान्य उचलत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शेगावच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करीत दिलेले धान्य व ऑनलाईन नोंद देण्यात असलेल्या धान्याच्या रेकॉर्डमध्ये तफावत आढळल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बिऱ्हाळे यांच्या आदेशाने तहसीलदारांनी रेशनचा दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. मात्र या दुकानाचा परवाना हा कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी तक्रारकर्त्यांसह गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत देखील दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सरपंच संतोष पडसकर यांनी सांगितले. तर या दुकानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी मात्र गावकऱ्यांनी केलेल्या आरोपांचे रेशन धान्य दुकानदार अशोक सावळे यांनी खंडन केले आहे.
हेही वाचा - प्रतिदिन साडेचार हजारांच्या पुढे रुग्णालयाला खर्च आकारता येणार नाही - आरोग्यमंत्री