बुलडाणा - खामगाव येथील एमआयडीसी परिसरात गांजाची अवैधरित्या केली जाणारी वाहतूक शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वाहतुक शाखेचे कर्मचाऱ्यांनी पकडली. या प्रकरणी ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ५७ हजार रुपयांचा ८५ किलो गांजा आणि चारचाकी वाहनासह एकूण ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोत्यामध्ये भरला होता गांजा-
आंध्रप्रदेश मधून पिंपळगांव राजाकडे येणाऱ्या एपी-२७-क्यु-६१३३ या महिंद्रा मॅक्स या वाहनामधून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत गांजाची वाहतूक करणारे वाहन पकडले. या वाहनाची तपासणी केली असता गाडीत गांजाने भरलेली ५ पोती आढळून आली. या पोत्यांमध्ये ८५ किलो गांजा भरला होता. बाजारात याची किंमत अंदाजे २ लाख ५५ हजार रुपये आहे. या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी गांजा आणि चारचाकीसह ५ ते ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुनील हूड करत आहेत.