बुलडाणा - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशासह राज्यात चौथा लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये आपली वाहने घेवून बिनकामी फिरणाऱ्या टवाळखोरांची संख्या कमी नाही. अशा बिनकामी फिरणाऱ्या टवाळखोरांवर जिल्हा वाहतूक पोलीस शाखेने पहिल्या लॉकडाऊनपासून १८ मे पर्यंत ८ हजार ९१२ टवाळखोरांच्या वाहनाला तब्बल २१ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा ऑनलाईन पद्धतीने दंड ठोठावला.
लॉकडाउनमध्ये बिनकामी गाड्या फिरणाऱ्यांवर कारवाई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विनाकारण आपले वाहन घेऊन फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी आदेश दिले होते. या आदेशाने जिल्हा वाहतूक पोलीस शाखेने लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलडाणा जिल्ह्यात वाहतूक पोलीस शाखेतील ४० कर्मचाऱ्यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते व सहा्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईनच्या केवळ ७ मशिनने जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली,खांमगाव, मेहकर, ज.जामोद,लोणार, सि. राजा, संग्रामपूर, मलकापूर, शेगाव, मोताळा, दे.राजा,नांदुरा या तालुक्यात काही शहरी आणि ग्रामीण भागात बिनकामी फिरणाऱ्या टवाळखोरांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली आहे. मार्च महिन्यात १ हजार ९२९ वाहनाला ५ लाख ७८ हजार ७०० रूपये, एप्रिल महिण्यात ४ हजार ६६३ वाहनाला ११ लाख ३४ हजार ९०० रुपये आणि आज सोमवारी १७ में पर्यंत २ हजार ३२० वाहनाला ४ लाख ४९ हजार १०० रुपये असे एकूण ८ हजार ९१२ टवळखोरांच्या वाहनाला २१ लक्ष ८२ हजार ७०० रुपयांचा दंड बुलडाणा जिल्हा वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने ठोठावण्यात आला आहे.