बुलडाणा - जिल्ह्यात एका वर्षात 556 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील तरूण मुलींचे प्रमाण अधिक असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या एका वर्षात मुलींचे अपहरण आणि बेपत्ता असल्याच्या 556 तक्रारींची नोंदी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - मलकापुरात मांडूळ सापासह एकाला अटक, जुगार अड्ड्यावरून लाखोंचा मुद्देमाल जप्त
मुली बेपत्ता झाल्याच्या या तक्रारींमध्ये 18 वर्षांच्या आतील 84 तक्रारी तर 18 ते 25 वयोगटातील 472 तक्रारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी 431 प्रकरणांचा छडा लागला आहे. याप्रकरणी अजूनही 125 मुली बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - 'आता पाणी प्यायलाही भीती वाटते'; अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे वक्तव्य
दिवसेंदिवस वयात आलेल्या मुली घरातून पळून जाणे किंवा मुलींना फूस लावून पळून नेणे, अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे शासकीय आकडेवारीमुळे समोर आले आहे. त्यामुळे पालकच नव्हे तर सर्वांसाठीच हा चिंतेचा विषय ठरत आहे. आपल्या देशात संयुक्त कुटुंब पद्धती होती. ज्यामध्ये वयात आलेल्या मुला-मुलींना प्रेम-जिव्हाळा मिळत होता. त्यावेळी सोशल मिडियाही नव्हता. आताच्या विभक्त कुटुंब पद्धती आणि सोशल मीडियाचा वापर यामुळे सोशल मीडियावर प्रेमाच्या उदात्तीकरणाच्या अतिरेकामुळे तरुणी कुटुंबियांचा विचार न करता घरून पळून जाण्याचे धाडस करत असल्याचे मत अभ्यासकांकडून त्याच बरोबर महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
तर मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या अनेक तक्रारी पालकांनी पोलिसात केल्या. मात्र, याला काही प्रमाणात पालक देखील जबाबदार असल्याने वयात आलेल्या मुलामुलींना विश्वासात घेऊन विचार विनिमय करणे, त्यांना वेळ देणे, सोशल मीडियाचा अतिरेक टाळणे, ही खबरदारी पालकांनी घेतल्यास अशा घटना रोखता येवू शकतात.