बुलडाणा - दहावी परीक्षेच्या तनावातून उंदीर मारण्याचे औषध खाऊन तीन विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकीवर खामगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत विद्यार्थिनींमध्ये नयना शिंदे (वय १७) आणि निकिता रोहनकर (वय १५) अशी नावे आहेत तर रुपाली किशोर उनोने हिच्यावर उपचार सुरू आहेत. या विद्यार्थिनी जिल्ह्यातील खामगाव येथील अरजण खिमजी नॅशनल कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत.
दरम्यान नयना शिंदे हिला शुक्रवारी 22 फेब्रुवारीला रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर तिला तेथून अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचदिवशी रुपाली उनोने हिला देखील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निकिता अनिल रोहनकार हिला शनिवारी 23 फेब्रुवारीला स्थानिक रूग्णालयानंतर अकोला येथे दाखल करण्यात आले. आज रविवारी 24 फेब्रुवारीला अकोला येथे उपचार दरम्यान नयना शिंदे ( चिंतामणी मंदिराजवळ खामगाव) आणिनिकिता रोहनकार (रा.पाळ नगर,रा खामगाव) या दोघींचा मृत्यू झाला, तर रुपाली उनोने हिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या विद्यार्थिनींनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली आहे. मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी पाणीपुरी खाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. ही घटना वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरल्याने पाणीपुरी विक्रेत्यांच्या मनात धडकी भरली होती. या घटनेनंतर पाणीपुरीवाल्यांनी आपली दुकाने काही काळ बंद ठेवली होती.