बुलडाणा - देऊळगावराजा येथे यूट्यूब चॅनेलमध्ये बातमी प्रकाशित करू, म्हणून रेशन दुकानदाराकडून 25 हजार रुपयाची लाच स्वीकारताना दोन खंडणीबहाद्दर पत्रकारांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्रीच्या सुमारास बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. दरम्यान, या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील महात्मा फुले मार्गावर पद्मकुमार शांतीलाल गिरणीवाले यांचे रेशनचे स्वस्त धान्य दुकान आहे. त्यांच्या रेशन दुकानात येऊन राहुल नायर, गणेश डोके यांनी रोशन दुकानदारास तुम्ही स्वस्त धान्य काळ्याबाजारात विक्री करता. आम्हाला पन्नास हजार रुपये द्या, नाहीतर तुमच्या स्वस्त धान्य दुकानाच्या बाबत वर्तमानपत्रात आणि यूट्यूब चॅनेलमध्ये बातम्या प्रसिद्ध करू, तुमच्या शिधापत्रिका धारकांना तुमच्या दुकानाविरोधात तक्रारी करण्यास लावू आणि तुमच्या दुकानाचा परवाना रद्द करू, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी दुकानदाराने आरोपींना ५० हजार रुपये देण्याचे कबूल करीत पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये मंगळवारी रात्री देण्याचे ठरले. त्यानंतर रेशन दुकानदार पद्मकुमार गिरणीवाले यांनी बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांसमक्ष मंगळवारी रात्री सापळा रचला.
यावेळी दोन आरोपींना २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी रेशन दुकानदार गिरणीवाले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शहरातील गणेश गंगाराम डोके, राहुल शिवकुमार नायर आणि गोटू शिंदे (रा. अंत्रि खेडेकर) या तिघांविरुद्ध खंडणीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पथक प्रमुख इम्रान इनामदार, उपनिरीक्षक अनिल भुसारी प्रकाश राठोड, महिला पोलीस कर्मचारी गीता बामांदे, भरत जंगले, नदीम शेख, संभाजी असोलकर, यांनी केली आहे. तर या खंडणी प्रकरणातील तिसरा आरोपी गोटू शिंदे हा फरार झाला आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.