भंडारा - मोहाडी तालुक्यातील मौदा येथे दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जितेंद्र सोपान बोंद्रे (वय 26), असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दु:खद बाब म्हणजे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मृत जितेंद्रचा साखरपुडा होता आणि त्याचदिवशी त्याची अंत्ययात्रा निघाली. जितेंद्रच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या गावावर शोककळा पसरली.
हेही वाचा - 'शिवभोजन' सुरू झाले पण नेमका लाभार्थी कोण ? भंडाऱ्यात बोगस लाभार्थ्यांचीच झुंबड
मोहाडी तालुक्यातील चिचखेडा गावातील जितेंद्र हा नागपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याचे लग्न जवाहरनगर परसोडा येथील एका तरुणीशी ठरले होते. जितेंद्रचा 27 जानेवारीला साखरपुडा होता. त्यासाठी तो त्याच्या मित्रासह एक दिवस अगोदर नागपूरहून निघाला होता. मौदा तालुक्यात सुरू असलेल्या परमात्मा एक सेवक मंडळाच्या कार्यक्रमासाठी तो काही काळ थांबला होता. त्यानंतर दुचाकीने तो आपल्या गावी चिचखेडा येथे जाण्यासाठी निघाला.
हेही वाचा - शिवभोजन थाळीचे उद्घाटन... जेवणाकडे लक्ष द्यायला पालकमंत्र्यांकडे नव्हता वेळ
काही अंतरावर गेल्यावर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. या अपघातात जितेंद्र दुभाजकावर जावून धडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र प्रशांत या अपघातात गंभीर जखमी झाला. जितेंद्रच्या मृत्यूची बातमी घरी समजताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भावी आयुष्याची गोड स्वप्ने रंगवत जितेंद्र आपल्या मित्रासोबत गावी जात होता. घरी त्याच्या साखरपुड्याची सर्व तयारी झाली होती. मात्र, नियतीला हे मान्य नसावे. त्याच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली.