भंडारा - पर्यावरण संरक्षणाच्या जागृतीसाठी ती सायकलने एकटीच निघाली महाराष्ट्र भ्रमणावर. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी सायकलने निघालेली शेतकरी कन्या प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे आज भंडारा जिल्ह्यात पोहचली आहे. प्रणाली ही यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट या गावातील शेतकऱ्यांची मुलगी आहे.
एखादी मुलगी घरून कामानिमित्त निघाली की, ज्या ठिकाणी तिला पोहोचायचे आहे, तेथे ती पोहोचेपर्यंत आई-वडिलांना काळजी वाटत असते. मुलगी एकटी आहे, कशी जाईल, काही त्रास होणार नाही ना, सुखरूप पोहोचेल का, असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात सुरू असतात.
मात्र, यवतमाळ तालुक्यातील प्रणालीला निसर्गावरील असलेल्या असीम प्रेमामुळे तिने संपूर्ण महाराष्ट्रात सायकलने आणि तेही एकटीने भ्रमण करण्याचे ठरविले. एकटीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा हा निर्णय खरं तर अतिशय धाडसी आहे. मात्र ध्येयवेड्या लोकांपुढे अडचणीही नांगी टेकतात हेही तेवढेच खरे आहे.
हेही वाचा - लंडनहून रत्नागिरीत आलेले 5 जण कोरोना संक्रमित नसल्याने दिलासा
4 ऑक्टोबरला निघाली घरातून
सध्या सुरू असलेल्या उपभोगवादी जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत असून आरोग्यची समस्याही निर्माण होत आहे. यासाठी पर्यावरण वाचवण्यासाठी जागरूकता करण्यासाठी प्रणाली घरातून निघाली. या दोन महिन्यांच्या प्रवासात तिने यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देत शुक्रवारी ती भंडाऱ्यात पोहचली आहे. ती दररोज 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करत एखाद्या गावी पोहचते. रात्रीला त्याच गावात ती मुक्काम करते आणि गावातील लोकांना पर्यावरणसंबधी जनजागृती करून दुसऱ्या दिवशी सकाळी दुसर्या गावाकडे प्रवासाला निघते, असा दिनक्रम सध्या सुरू आहे.
सोशल वर्कची पदवी घेतली
प्रणालीने चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामेडवार सोशल वर्क कॉलेजमधून पदवी घेतली आहे. समाजासाठी आपले काही देणे आहे, याची जाणीव असल्यामुळे पर्यावरण बचावासाठी तिने महाराष्ट्र भ्रमणाचा हा निर्णय घेतला आहे.
मनुष्याने निसर्गावर भरपूर प्रेम करावे
'निसर्ग आपल्याला भरभरून देतो. मात्र, त्या बदल्यात मनुष्य निसर्गाची हानीच करीत आहे. कोरोनासारख्या एका अनोळखी विषाणूमुळे माणसांना 6 महिने घरी राहावे लागले. त्या काळात बरेच वायुप्रदूषण कमी झाले. मात्र लॉकडाऊन उघडल्यानंतर पुन्हा वायुप्रदूषणात अतोनात वाढ होताना दिसत आहे. निसर्गाचा होणारा हा ऱ्हास कमी करणे ही प्रत्येक मनुष्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने निसर्गावर प्रेम करावे. तरच येणाऱ्या पिढीला शुद्ध वायू शुद्ध पाणी आणि शुद्ध जीवन मिळेल. अन्यथा ज्या सर्व गोष्टी नागरिकांना मोफत मिळत आहेत त्या मिळवण्यासाठी हजार रुपये खर्च करावे लागतील आणि तरीही ते मिळण्याची शक्यता कमीच राहील,' हाच संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र भ्रमणावर निघाल्याचे प्रणालीने सांगितले. हा प्रवास एकटीने सुरू केला असला तरी अजूनपर्यंत या प्रवासात कुठलाही वाईट अनुभव आला नसल्याचे तिने सांगितले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मी शेतकऱ्याची मुलगी असल्याने मला ग्रामीण जीवनाची चांगली समज आहे. त्यामुळे या प्रवासात अडचणी येत नाहीत, असे तिने सांगितले. तिच्या धाडसी निर्णयाचे प्रत्येक जण स्वागत करून गावकरीही तिला आपुलकीने मदत करत आहेत.
हेही वाचा - बाजारात कोथिंबीरीला कवडीमोल दर, नुकसान धण्यातून भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न