भंडारा - मद्यधुंद कारचालकाने एका महिलेला व सायकलस्वार तरुणीला चिरडल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारचालकाने तुमसर बसस्थानक परिसरात एका महिलेला धडक दिली, त्यानंतर पळून जाणाऱ्या या कारचालकाचा नागरिकांनी पाठलाग केला, मात्र तो घटनास्थळावरून पसार झाला, दरम्यान यानंतर याच कारचालकाने पुन्हा एकदा खापा शिवरात एका सायकस्वार तरुणीला धडक दिली.
मोहिनी शेषराव बांते (वय २०) आणि शामकला तितिरमारे (वय 45) असे या दोघींचे नाव आहे. मोहिनीवर नागपूरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान तिचा गुरुवारी मृत्यू झाला, तर शामकला तितिरमारे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना सिसिटीव्हीमध्ये कैद
बुधवारी दुपारी चारचाकी क्र.(एम.एच.३१/सी.एन.६३९३) ही तुमसर बसस्तानकासमोर उभी होती. त्यानंतर चालकाने मद्यधुंद अवस्थमध्ये ही गाडी सुरू केली, मात्र त्याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने, याच परिसरात असलेल्या फळ विक्रेत्या शामकला तितिरमारे या महिलेला त्याने धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने भरधाव वेगात गाडी चालवत घटनास्थळावरून पळ काढला. पुढे पुन्हा एकदा खापा शिवरात एका सायकस्वार तरुणीला धडक दिली. या धडकेनंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी शेतात घुसल्याने कारचालकाने कार तिथेच सोडून पळ काढला. दरम्यान अद्यापही कारचालक फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोहिनीचे ठरणार होते लग्न
अपघातात जखमी झालेल्या मोहिनी शेषराव बांते ( २०) या तरुणीचा उपचारादरम्यान नागपूर येथे बुधवारी मृत्यू झाला. मोहिनीला नुकतीच लग्नासाठी मागणी घालण्यात आली होती. ज्या दिवशी तिचे लग्न ठरणार होते, त्याच दिवशी दुर्दैवाने तिच्यावर काळाने घाला घातला.