भंडारा - जिल्ह्यातील 1200 लोकसंख्येची वस्ती असलेल्या येदूरबूची गावात सद्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. महत्वाचे म्हणजे या गावालगतच बावनथडी धरण असून प्रशासनाचे नियोजन नसल्याने 'धरण उशाला, कोरड घश्याला' अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे. पाण्याच्या समस्येमुळे गावात पाहुणे, नातेवाईक यायला तयार नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पाणीटंचाईवर तोडगा काढावी, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. मात्र प्रशासनाने गावात भीषण पाणी टंचाई नसल्याचे सांगितले आहे.
तुमसर तालुक्यातील येदूरबूची गावात सध्या पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थ पहाटे 3 वाजल्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहरीतून पायपीट करत पाणी भरतात. येदरबुची हे गाव संपूर्णपणे आदिवासी गाव असून येथील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर गावात 4 ठिकाणी सार्वजनिक हात पंप ( बोरवेल पंप ) असून या हातपंपांना पाणी सद्या येत नाही. विशेष म्हणजे गावालगतच बावनथडी धरण असून प्रशासनाचे नियोजन नसल्याने गावकऱ्यांना 'धरण माझ्या उशाला आणि कोरड माझ्या घश्याला' म्हणायची वेळ आली आहे.
जिल्हा प्रशासनच्यावतीने राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 30 हजार लिटरचे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. मात्र आठवड्यात फक्त एकदा 15 हजार लिटरचा जलकुंभ भरला जातो. गावकऱ्यांसाठी तयार करण्यात येणारी राष्ट्रीय पेयजल योजना 'पांढरा हत्ती' बनला आहे. गावापासून 1 किलो मीटर अंतरावरील एका शेतात असलेल्या विहिरीला थोड्या प्रमाणात पाणी असून 1200 लोकसंख्येचे गाव पहाटे 3 वाजल्यापासून विहिरीवर पाणी भरण्यासाठी रांगा लावतात.
सर्व गावकरी एकत्र पाणी भरत असल्यामुळे या विहिरीचे पाणी गढुळ होते. तेच पाणी गावातील नागरिक पिण्याकरता नाईलाजास्तव वापरतात. या पाणी समस्येचा परिणाम नातेसंबंधावर पडला आहे. या गावातील लोकांचे नातेवाईक मागील 3 वर्षापासून या गावात यायला तयार नाही. अशी खंत गावकऱ्यांनी सांगितली.