भंडारा- 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी प्रियकर, प्रेयसी एकमेकांविषयी असलेला प्रेम व्यक्त करत असतात. मात्र, लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तुपकर या गावातील शेतकऱ्यांनीसुद्धा हा दिवस साजरा केला आहे तेही अनोख्या पद्धतीने. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवसीय पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले.
मुरमाडी/तुपकर या गावातील शेतकऱ्यांना आपल्या गायी, म्हशी व इतर जनावरांवर चांगले प्रेम आहे. त्यामुळेच की काय या गावात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे काल (शुक्रवार) 'व्हॅलंटाईन डे' चे औचित्य साधत गावात एक दिवसीय पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत विविध प्रजातीच्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व कोंबडे ठेवण्यात आले होते. तसेच शेतीशी निगडित आधुनिक यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान याचे प्रदर्शन करण्यात आले होते. शेतकऱ्यांमध्ये आपल्या जनावरांप्रति आपुलकी व प्रेम वाढून त्यातून उन्नती व्हावी या हेतूने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनीत शेतकऱ्यांना पशूंचे संगोपन कसे करावे याची सविस्तर माहितीही देण्यात आली होती. त्याचबरोब, शेतकऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता. पशुपक्षी प्रदर्शनीत शेतकऱ्यांचा उत्साह वाढावा या करिता विविध रोख बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती. अशा प्रकारच्या आयोजनामुळे शेतकऱ्यांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे.
हेही वाचा- भंडारा नगरपरिषदेत भाजपवर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा ओढावली पराभवाची नामुष्की