भंडारा - जिल्ह्यात रविवारी दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, भंडाऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 31 वर पोहोचला आहे. मुंबईतून साकोली येथे 13 तारखेला दोन तरुण आले होते. या तरुणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. 29 तारखेला या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज या दोघांचेही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
विशेष म्हणजे यातील एकाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दरम्यान, जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी गेल्याने सद्यस्थितीत 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
आतापर्यंत 1 हजार 791 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 31 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 613 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 147 नमुन्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 12 हजार 755 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी 28 दिवस घरामध्येच राहावे, घराबाहेर पडू नये अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.