भंडारा - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. यामध्ये तुमसर तालुक्यातील सिहोरा-चांदपूर जलाशयाच्या मुख्य कालव्यात आज मृतदेह आढळला आहे. तर भंडारा शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एकाने आत्महत्या केली असून त्याचा शोध सुरू आहे.
आठ दिवसापासून होता बेपत्ता -
तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदपूर जलाशयात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांनी याची माहिती सिहोरा पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिकांच्या हा मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्याच्या खिशात एक मोबाईल आणि काही बिले आढळून आले. त्या बिलामध्ये असलेल्या नावाच्या आधारे या व्यक्तीची ओळख पाठविण्यात आली. प्रकाश कटरे (वय-अंदाजे 50 रा. चिचोली (बघेडा) ता. तुमसर असे मृताचे नाव आहे.
मृत हा गावावरून आठ दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. शोधाशोध सुरु असतांना आज चांदपूर येथील लोकांना मुख्य कालव्यात मृतदेह तरंगताना दिसला. गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. मृत हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. दोन वर्षाआधी मृताच्या पत्नीने मृताच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपास सिहोरा पोलीस करीत आहे.
हेही वाचा - अकोला शहरात संचारबंदी; रस्त्यांवर पोलिसांचा तगडा पहारा
मलेरिया विभागात कार्यरत कर्मचाऱ्याने घेतली वैनगंगेत उडी -
जिल्हा परिषदेच्या मलेरिया विभागात कार्यरत कर्मचाऱ्याने वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलवारुन उडी घेतल्याची घटना घडली. राजेश साखरवाडे (वय 28 वर्ष, रा. पिंडकेपार) असे उडी घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोठ्या पुलावर त्याच्या चपला आढळून आल्याने त्याने नदीत उड़ी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून वैनगंगा नदीत त्याचा शोध सुरू आहे. या दोन्ही लोकांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? तसेच आत्महत्या केल्यास आत्महत्येचे कारण काय? या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करीत आहेत.