भंडारा - आमदार राजू कारेमोरे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम जामिन देत दिलासा दिला आहे. दिवाणी न्यायालयाने आमदार कारेमारे यांचा जामीन रद्द केल्यानंतर तासाभरातच जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार कारेमारे यांचा जामिन मंजूर केला आहे.
तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना किमान सोमवारची रात्र ही तुरुंगात घालावी लागणार होती. कारण आमदार राजू कारेमोरे यांना सोमवारी अटक केल्यानंतर दिवाणी व फौजदारी न्यायालय मोहाडी येथे हजर केले असता न्यायालयाने जामीन रद्द केला होता. न्यायालयाने आमदार कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना त्यांच्या वरठी येथील घरातून अटक केली. अटकेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणी झाल्यानंतर मोहाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
जामीन रद्द केल्याने थेट तुरुंगात रवानगी-
मोहाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सुनावणी दरम्यान न्यायालयाने आमदारांना जामीन नामंजूर केला. 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमांमध्ये विनयभंगाच्या गुन्ह्याचा समावेश असल्याने आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने आमदारांना जामीन नाकारल्याने त्यांना आजची रात्र भंडारा जिल्हा कारागृहात काढावी लागणार होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने जामिन दिल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम टळला आहे.
काय घडले होते प्रकरण-
जिल्हाच्या तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत धिगांणा घातला. आमदार राजू कारेमोरे धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. मारहाण झालेल्या दोन व्यापाऱ्यांनी पोलिसांनी 50 लाख रुपये रोख आणि सोन्याची साखळी चोरून नेल्याचा आरोप केला. तसेच विनाकारण मारहाण केल्याची तक्रार दिली होती. तर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याची तक्रार पोलिसांनी नोंदविली होती. दोन दिवसाच्या चौकशीनंतर आज राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आलेली आहे. भंडारा येथून अटक करून त्यांना मोहन पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना मोहाडी येथील न्यायालयात हजर करणार आले.
हेही वाचा-Ambernath Gang Rape Case : अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक
पोलिसांनी पैसे पळविल्याची व्यापाऱ्यांची पोलिसात तक्रार दाखल-
मिळालेल्या माहितीनुसार आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे रात्री 9 वाजता आमदारांच्या घरून 50 लाखांची रोकड घेऊन चारचाकीने तुमसरकडे घेऊन जात होते. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी वाहनातील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळील 50 लाख रुपयांची रक्कम आणि सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे.
हेही वाचा-Policeman Rape Married Woman : पोलीस कर्मचाऱ्यानी केला विवाहित महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक
राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पोलीस अधिकाऱ्याची तक्रार करणार- आमदार कारेमोरे
बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उप निरीक्षक राणे यांनीदेखील शासकीय कामात अडथळा करीत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे आमदार राजू कारेमोरे यांनी खाकी वर्दी घालून दबंग गिरी करणाऱ्या पोलीस उप निरीक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले
हेही वाचा-Boy drowned in bucket : पाण्याने भरलेल्या बादलीत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
जिल्ह्यातील वातावरण निघाले ढवळून-
जामीन मिळण्यासाठी उद्या आमदारांकडून वकिलांमार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. आमदारांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते न्यायालयाच्या बाहेर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे काही नेतेही त्या ठिकाणी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदाराला झालेल्या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे अशा पद्धतीने असभ्य वर्तन करणार्या लोकप्रतिनिधींवर झालेली ही कारवाई न्यायसंगत असल्याचे बोलले जात आहे.