भंडारा - ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या सत्ताधारी भाजपच्या संकल्पाला भाजपच्याच पदाधिकाऱ्याने हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे. विनापरवानगी २० ते २५ झाडांची कटई करून वाहतूक करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचा ट्रॅक्टर वनविभागाच्या फिरत्या पथकाने जप्त केला आहे. कारवाई होऊ नये, यासाठी भाजपच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
शहरापासून १० किमी अंतरावर भिलेवाड गाव आहे. या गावातील शेतात झाडे तोडून लाकडांनी भरलेला ट्रॅक्टर वनविभागाच्या फिरत्या पथकाला गुरुवारी दिसला. ती झाडे कापण्याची वनविभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे फिरत्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी लाकडांसह ट्रॅक्टर जप्त केला.
ट्रॅक्टरमध्ये जवळपास २० ते २५ झाडांची लाकडे होती. यामध्ये बोर शेंबडी यासारखे संरक्षित असलेल्या झाडाची लाकडे होती. ही सर्व झाडे भाजप पदाधिकाऱ्याने स्वतःच्या शेतातूनच तोडली आहेत का? इतर ठिकाणाहून तोडून आणली आहेत ? या विषयी वनअधिकारी सखोल तपास करत आहेत.
ट्रॅक्टर जप्तीची कारवाई होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ते सोडून देण्यासाठी आणि कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी भाजपा नेत्यांचा दबाव सुरू झाला आहे. याविषयी तपास सुरू असून अधिक बोलता येणार नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास टाळाटाळ केली.
दरवर्षी कोट्यवधी खर्च करून वृक्ष लागवड सप्ताह साजरा केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी वृक्ष लावले जातात. मात्र सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी नियमांची पायमल्ली करत आहे. हेच पदाधिकारी कार्यवाही होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणत असतील तर वृक्ष लागवड हा केवळ देखावा ठरण्याची भीती आहे.