भंडारा - आजपर्यंत लहान मोठे प्राणी शहरात येत असल्याचे ऐकीवात होते. मात्र, काल (13 फेब्रुवारी) शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे एका पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, वनविभागानेही वाघ येऊन गेल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे, परिसरातील गावांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - भंंडारा जिल्ह्यातील 2 घोड्यांना ग्लाडर्स आजार, घोड्यांची वाहतूक बंदीचे आदेश
वाघ येऊन गेल्याच्या चर्चेत तथ्य
वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या व भंडारा शहराचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जात असलेल्या गणेशपूर येथील नवीन स्मशानभूमित आणि पिंडकेपार येथे असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकी जवळ ओल्या जमिनीवर काही लोकांना वाघाच्या पायाचे ठसे आढळले. याबाबत गणेशपूर येथील यशवंत सोनकुसरे यांनी उपवनसरंक्षकांना माहिती दिली. माहितीच्या आधारे उपवनसंरक्षकांनी वनविभागाचे एक पथक पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली असता वाघ येऊन गेल्याच्या चर्चेत तथ्य असल्याचे पुढे आले.
वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने गणेशपूर, पिंडकेपार, कोरंभी आणि परिसरातील गावांमध्ये दिवसभर शोधकार्य राबविण्यात आले. सोबतच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले. वन अधिकाऱ्यांसह गणेशपूरचे सरपंच मनीष गणवीर हे पूर्णवेळ पथकासह होते.
वन विभागाने वाढवली गस्त
ठसे हे वाघाचे असून काही दिवसांपूर्वी नागझिरा अभयारण्यातून आलेला व माटोरा जंगलात कॅमेरात ट्रॅप झालेलाच हा वाघ असावा, अशी शक्यता भंडाऱ्याचे उपवनसरंक्षक भलावी यांनी स्पष्ट केले. वन अधिकारी आणि कर्मचारी शोधकार्यात लागले असून ज्या भागात ठसे आढळले तेथे गस्त वाढविला असल्याचे सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
अफवांवर विश्वास ठेवू नये
वाघ शहरात येऊन गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे, प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी सावध रहावे व कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता गरज भासल्यास वन विभाग किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी केले.
हेही वाचा - तीन निवृत्त सैनिकांनी गरिबांसाठी सुरू केली सैन्य प्रशिक्षण अकादमी