भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी चक्क बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामध्ये भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले व माजी भाजप खासदार डॉ. खुशाल बोपचे यांचा समावेश आहे.
भाजपमध्ये पक्षांतर्गतच बंडखोरी झाल्यामुळे याचा फटका विद्यमान भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे मोठे नेते या बंडखोर नेत्यांची मनधरणी करीत आहेत. डॉ. खुशाल बोपचे व राजेंद्र पटले या अपक्ष उमेदवारांचा विचार केला असता, ह्या दोन्ही नेत्यांचे पोवार समाजात मोठे प्राबल्य आहे. शिवाय उद्या २८ मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे भाजपमध्ये आतून मोठी खळबळ दिसत आहे.
बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतला तरीही त्याचा परिणाम भाजप उमेदवारावर दिसणार नसल्याचे भाजप जिल्हाध्यक्षकांकडून सांगण्यात आले आहे.