भंडारा - सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा जीव गेला होता. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांसह चार जणांना निलंबित करण्यात आले. तसेच बालरोग तज्ञ असलेल्या एका डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर आरोग्यमंत्र्यांनी मुंबईत ही कारवाईची घोषणा केली.
13 दिवसाने मिळाला अहवाल-
8 जानेवारीच्या मध्य रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा जीव गेला होता. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री यांनी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात चौकशीसाठी समिती गठित केली होती. अकरा दिवसानंतर कालिया समितीने अहवाल शासनाच्या सुपूर्द केला. जिल्हा शल्य चिकित्सक संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले होते. दुर्लक्षामुळे ही घटना घडली, असा निष्कर्ष समितीने काढल्यानंतर दोषींवर कारवाईची शिफारसही करण्यात आली होती.
दरम्यान गुरुवारी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रचना मेश्राम, अधिपरीचारिका शुभांगी साठवणे व स्मिता आंबीलडूके यांना निलंबित केले. तसेच बाल रोग तज्ञ सुशील अंबादे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सुनिता बढे यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. या कारवाईमुळे 13 दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपली आहे.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो का याकडे लक्ष
दहा बालकांच्या मृत्यूच्या घटनेमध्ये तीन बालकांचा हात जडून मृत्यू झाला. उर्वरित सात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी केली जात होती. आज अहवालाच्या आधारे आरोग्यमंत्र्यांनी कारवाई केली असली तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करण्याच्या मागणीकडे शासन किती गांभीर्याने पाहते याकडे पाहणे योग्य ठरेल.
हेही वाचा- भाजपचे बडे नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात - गृहमंत्री अनिल देशमुख