भंडारा - जिल्ह्यातील पवनी येथील चंडिका मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे या चोरांनी देवीचे दर्शन सुद्धा घेतले. एवढेच नव्हे तर आपल्या चपला मंदिराबाहेर काढून या चोरांनी मंदिरात प्रवेश केला. यामुळे ही चोरीची घटना जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
पवनीमधील प्रसिद्ध असलेल्या चंडिका मंदिरात सात जूनला रात्री 2 च्या दरम्यान चोरी झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये दोन चोर मंदिरात शिरताना दिसत आहेत. त्यापैकी एकाने त्याचा चेहरा पूर्ण झाकला आहे. तर दुसऱ्याने चेहरा न झाकताच गाभाऱ्यात प्रवेश केला. मात्र गाभाऱ्यात सीसीटीव्ही लावला असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने पुन्हा गाभाऱ्याबाहेर येत चेहरा झाकला व गाभाऱ्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे या चोराने देवीचे दर्शन देखील घेतले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान हे अट्टल चोर नसून लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर ही वेळ आली असल्याची चर्चा देखील परिसरात होत आहे. या चोरांनी मंदिरात प्रवेश करून देवीच्या दागीन्यांचा शोध घेतला, त्यात त्यांना यश आले नाही. तसेच त्यांनी दानपेटी फोडण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र लॉकडाऊनमुळे दान पेटीत देखील विशेष असे पैसे नव्हते. त्यामुळे जे हाती लागले ते घेऊन या चोरांनी पोबारा केला. या चोराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -शरद पवार - प्रशांत किशोर भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...