भंडारा - तुमसर तालुक्यातील एका कापड व्यवसायिकाची हत्या करण्यात आली आहे. या व्यक्तीची दारूमधून विष देऊन नंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. तर केवळ एक फोटो मिळवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. अमित मेश्राम (रा. फुलचूर, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजकुमार कटरे (वय 45) याला अटक केली आहे.
हेही वाचा - शासकीय मानधन मिळवून देण्याच्या नावावर लोककलाकारांकडून लाच घेणाऱ्या लिपिकाला अटक
याबाबत अधिक माहिती अशी की, सिहोरा येथे कापड्याचा व्यवसाय करणारा अमित मेश्राम हा मध्यप्रदेशातील फुलचूर येथील रहिवासी होता. त्याने सीहोरा येथे साडी सेंटरचा व्यवसाय सुरू केला होता. तो सिहोरा येथेच भाड्याची खोली घेऊन राहत होता. या दरम्यान गावाशेजारी मांगली या गावातील एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तब्बल 8 वर्षे हे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, दोघेही भिन्न जातीचे असल्याने परिवारातील लोकांनी त्यांच्या लग्नास नकार दिला.
हेही वाचा - मिळणाऱ्या बोनसचा फायदा धान खरेदी केंद्रातील लोक घेतात, शेतकऱ्यांचा आरोप
शेवटी अमितचे मध्यप्रदेशातील एका तरुणीसोबत लग्न जुळले. त्यावेळी त्याच्या प्रेयसीचेही एका दुसऱ्या तरुणाशी लग्न जुळले. मात्र, अमितच्या मोबाईलमध्ये तरुणीचे फोटो होते. हे फोटो तो व्हायरल करेल, अशी भीती तरुणीच्या परिवाराला होती. त्यामुळे हे फोटो मोबाईलमधून डिलीट करण्यासाठी तरुणीच्या काकाने अमितला धनेगाव शिवारातील कालव्यावर बोलवले. तेथे या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि या वादातच त्याची हत्या करण्यात आली.
अमितला सुरवातीला दारूतून विष देण्यात आले. त्यानंतर तो खाली पडताच आरोपी राजकुमार कटरे याने त्याचा गळा आवळून त्याला ठार मारले, अशी कबुली आरोपीने पोलिसांपुढे दिली आहे.