भंडारा - उत्पन्नाचा दाखला मागायला गेलेल्या एका वृद्ध महिलेवर तलाठ्याने चक्क चप्पल उगारल्याचा प्रकार जिल्ह्यातील लाखनी येथे घडला आहे. दाखला हवा असेल तर कलेक्टरकडे जा, माझे कोणी काहीही करू शकत नाही, अशी मग्रुरीची भाषाही यावेळी या तलाठ्याने महिलेशी बोलताना वापरली. जी. डी. शिवनकर असे या तलाठ्याचे नाव आहे.
शेवंता हटनागर ही विधवा वृद्ध महिला उत्पनाच्या दाखल्यासाठी मागील ८ दिवसांपासून लाखनी येथील तलाठी जी. डी. शिवणकर यांच्या कार्यालयात जात होती. मात्र, तलाठी सदर महिलेला टाळाटाळ करत होता. त्यामुळे या महिलेने त्यांच्या सोबत लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तितिरमारे यांना सोबत घेऊन गेली. म्हणून या तलाठ्य़ाने तू माझ्या कार्यालयात का आला ? चल निघ इथून असे अभद्रपणे बोलत व अश्लील शिव्या दिल्या. एवढेच नव्हे, तर चप्पल घेऊन मारायलाही धावला.
शासकीय अधिकारी हा नागरिकांना सेवा देण्यासाठी शासनाकडून नेमलेला असतो. मात्र, हाच अधिकारी जर नागरिकांना सेवा न देता चपलेने मार देईल असे बेताल वक्तव्य करीत असेल तर जनसामान्यांनी शासकीय सेवेसाठी कोणाकडे जावे ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे तलाठी जी. डी. शिवणकर यांचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवणकर हे प्रत्येक कामासाठी लोकांकडून लाच घेतात. ज्यांनी त्यांना लाच दिली नाही अशा लोकांना कार्यालयाच्या फेऱ्या मारयला लावतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. वरिष्ठांनाही न घाबरणाऱ्या या उर्मट तलाठ्यावर योग्य ती कारवाई करून निलंबित करण्याची मागणी गावकऱयांनी केली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तितिरमारे व शेवंता हटनागर यांनी लाखनी तहसीलदार मल्लिक विराणी यांना निवेदन दिले आहे. तर या प्रकरणाबाबत पटवारी शिवनकर यांच्याची संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.