भंडारा- जिल्ह्यात प्रवेश बंदी असतानाही नागपूरच्या रेडझोनमधील तीन लोकांचे कुटुंब भंडारा जिल्ह्यात दाखल झाल्याचे प्रकरण आता अधिकाऱ्यांना भोवणार आहे. ईटीव्ही भारतने सर्वप्रथम ही बातमी लावली होती. या बातमीची दखल भंडारा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतली असून, मी या प्रकरणाला किती गांभीर्याने घेतले आहे हे लवकरच कारवाईच्या माध्यमातून दिसेल असे त्यांनी सांगितले.
बुधवारी नागपूरच्या कोरोनाबाधित मोमीनपुरा (रेड झोन) मधून एक कुटुंब भंडारामध्ये आले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणेला देऊनही कोणीही त्याची दखल घेतली नाही. याविषयीची बातमी सर्वप्रथम ईटीव्ही भारतने दाखवली होती. या बातमीची दखल पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतली. त्यांनी याविषयी अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि जे कोणी अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर लवकरच कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शनिवारी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. भंडारा जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा,पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग तसेच माध्यमांचे त्यांनी आभार मानले आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली. येणाऱ्या काळात कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे काय नियोजन आहे त्या विषयी सविस्तर आढावा घेऊन निर्देश दिले. एकीकडे सुनील केदार यांनी प्रशंसा केली असली तरी दुसरीकडे शासनाने नेमून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली आहे.