भंडारा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर राज्यात नागपूर जिल्हा रेड कॉरिडोर म्हणून घोषित करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील भाजी विक्रेते हे भंडारा जिल्ह्यात असलेल्या बीटीबी भाजी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. परिणामी येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
जीवनावश्यक वस्तू म्हणून भाजी मार्केट सुरू ठेवण्याचे आदेश भंडाऱयाच्या जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. बीटीबी मार्केट हे जिल्ह्यातील सर्वांत मोठी भाजी मंडी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठे सर्वच प्रकारचे भाजी विक्रते येथे येतात. त्यातच नागपूरचे मार्केट बंद झाल्याने तेथील भाजी विक्रतेही येथे येत आहेत. त्यामुळे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होत आहे.
या ठिकाणी बीटीबी मार्केटतर्फे सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आला असून बाजार समितीत येणाऱ्या लोकांना सॅनिटाईज करून प्रवेश दिला जात आहे. मात्र, या ठिकाणी पोलिसांचा हवा तसा बंदोबस्त नसल्याने गर्दीचा सामना करावा लागत आहे. भंडारा जिल्हा सध्या जरी कोरोनामुक्त असला तरी या ठिकाणी होत असलेल्या गर्दीमुळे आणि नागपूरवरून येणाऱ्या लोकांमुळे भंडारा जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.