भंडारा - गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपविरोधी वातावरण असतानाही जर प्रत्येक प्रभागातून भाजपचा उमेदवार आघाडी घेऊन विजय होत असेल तर हा निकाल आश्चर्यचकित करणारा आहे, असे मत माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी दुसरा पर्याय शोधणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
नुकत्याच झालेल्या लोसकभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा एक लाख ९७ हजार मतांनी दारुण पराभव झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पराभव का झाला? याची कारणमीमांसा करण्यासाठी आज पटेल यांनी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
निवडणुकीदरम्यान मी दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या, दौरे केले त्यादरम्यान लोकांशी चर्चा करताना शेतकरी वर्ग आणि बेरोजगार वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपविरुद्ध होता. एवढेच काय तर व्यापारीसुद्धा भाजपच्या विरोधी होते, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपविरोधी वातावरण असतानाही आमच्या उमेदवाराला दोन्ही जिल्ह्यातून तसेच प्रत्येक प्रभागातून जर कमी मते मिळत असतील, तर हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निकाल आहे, असे पटेल म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बरेच गाव जिल्हा परिषदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. निकाल हाती आल्यावर त्या निकालांमध्ये त्या ठिकाणावरून भाजपला मतदान झाल्याचे दिसत असल्याने प्रत्येकांना आश्चर्यचकीत करणारा निकाल आहे. एवढेच नाही तर भंडारा विधानसभा क्षेत्रातून भाजपला तब्बल ५५ हजार मतांची मिळालेली लीड हा कोड्यात टाकणारी आहे. मागील ३० वर्षापासून नाना पंचबुद्धे सरपंचापासून जिल्हा परिषद आमदार असे राजकीय कारकीर्द असलेल्या व्यक्तीला एवढ्या कमी प्रमाणात मतदान मिळणे शक्य नाही. एवढेच काय तर त्यांच्या जन्म गावातूनसुद्धा त्यांना मिळणारे मतदान कमी असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ईव्हीएम मशिनबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा राजकीय पक्षाची मागणी फेटाळून लावल्यानंतर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भविष्यात कोणता पर्याय शोधावा याचा विचार करावा लागेल आणि भाजपविरुद्ध एवढे वातावरण असतानाही ते जर बहुमताने निवडून येत असतील, तर लोकांसमोर नेमके कोणते मुद्दे घेऊन जावे याचाही विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.