भंडारा - कोरोना काळातील नागरिकांचे वीजबिल माफ करणे हे शक्य आहे. मात्र, तिघाडीचे सरकार असल्याने आणि ऊर्जा खाते काँग्रेसकडे असल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना बदनाम करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी ऊर्जा खात्याला मुद्दाम डावलत आहे, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर, येणाऱ्या पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपाचे संदीप जोशी यांचा 70 टक्के मतांनी विजय होणार, असे त्यांनी सांगितले.
आज भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना बावकुळे यांनी सदर वक्तव्य केले. वीजबिल माफीवरून महाराष्ट्रात रणकंदन सुरू आहे. सुरुवातीला वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली गेली. मात्र, आता वीजबिल माफ होणार नाही, अशी ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या अगोदरही बऱ्याच सरकारच्या काळात वीजबिल माफ केले गेले. यासाठी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा खात्यात आवश्यक असलेले पैसे जमा केल्यास आणि ऊर्जा खात्याने ते बिल स्क्रॅप केल्या हा प्रश्न सहज संपू शकतो. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या खात्याला पैशाची आवश्यकता असताना त्यांना पैसा मिळू शकते, मात्र ऊर्जामंत्री हे काँग्रेसचे असल्यामुळे त्यांच्या खात्याला पैसे देताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुद्दाम बगल देत आहे, असे बावनकुळे म्हणाले.
एकंदरीतच ऊर्जामंत्री काँग्रेसचा असल्यामुळे काँग्रेस आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना बदनाम करण्यासाठीचा हा षड्यंत्र आहे. ऊर्जा खात्याला शासनातर्फे मदतच मिळत नसेल, तर अशा खात्याचा मंत्री राहून काय उपयोग, त्यापेक्षा नितीन राऊत यांनी या खात्याचा राजीनामा द्यावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपाच्या उमेदवाराचा 70 टक्के मतांनी विजय होणार
सध्या होऊ घातलेल्या पदवीधर निवडणुकीमध्ये विदर्भातून भाजपाचे संदीप जोशी यांना एकूण मतांपैकी 70 टक्के मतदान होईल. त्यामुळे, भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मागील अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये आघाडी सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करण्याचे काम केले आहे. तसेच, नागपूर अधिवेशन न घेण्याचा पाप या सरकारने केला आहे. शेतकऱ्यांना महापुरामुळे झालेले नुकसान किंवा किडीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. तर, भंडारा सारख्या जिल्ह्यांमध्ये अवैध वाळू उत्खनन, अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सर्व अनागोंदी कारभाराविषयी पदवीधर मतदारांना माहिती देऊ आणि या निवडणुकीत शिक्षित पदवीधर मतदार आपल्या मनातील राग दाखवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपाच्या उमेदवाराला नक्कीच विजयी करेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - पवनीच्या परकोट किल्ल्यावर दीपोत्सव; ५ हजार दिव्यांच्या प्रकाशात किल्ल्याचा कायापालट