भंडारा - शेतकऱ्यांची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकर पटावर कोर्टाच्या आदेशानंतर बंदी आणण्यात आली आहे. मात्र, शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या शंकरपटाच्या आयोजनामध्ये खंड पडू नये म्हणून भंडारा जिल्ह्याच्या डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी परंपरा जपण्याकरीता यांत्रिक शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.
रिव्हर्स ट्रॅक्टरचा पट -
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील हा शंकरपट जनतेच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे. शेकडो वर्षांपासून या गावांमध्ये बैलांचा शंकरपट भरविला जात होता. केवळ जिल्ह्यातून नाही, तर जिल्ह्याबाहेरचे शेतकरी मोठ्या उत्साहाने त्यांच्या बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होत होते. मात्र, कोर्टाच्या बंदीनंतर शंकरपट बंद करण्यात आला. त्यामुळे डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी पट भरविण्याची ही प्रथा अविरत सुरू राहावी म्हणून बैलान ऐवजी यांत्रिक युगातील शेतकऱ्यांचे मित्र असलेले ट्रॅक्टर यांचा पट भरविला आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा उलटा ट्रॅक्टर चालवण्याची ठेवण्यात आली आहे.
नागरिकांनी दाखविली उत्सुकता -
शंकरपट म्हटले की बैलजोडी आलीच पण बैलांच्या शर्यतीवर बंदी असताना पट भरवायचा कसा, या ध्येयाने शेवटी बैलांऐवजी ट्रॅक्टर वापरायची शक्कल लावली गेली. कारण आता शेतातील बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. यातही काहीतरी नवीन असावे, जे लोकांना आकर्षित करेल म्हणून हा ट्रॅक्टर उलटा चालवायचा निर्णय घेण्यात आल्याने या स्पर्धेत चुरस वाढली आहे.
हेही वाचा - विभागीय आयुक्त जेव्हा खांद्यावर पिशवी घेऊन आठवडी बाजारत दिसले!