भंडारा- येथील पवनी तालुक्यातील कोंढा ते बेलाटी मार्गावर मदर टेरेसा पब्लिक स्कुल बसचा अपघात झाला. यात तीन विद्यार्थी व तीन महिला कर्मचारी जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हेही वाचा- आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार
गाडीमध्ये एकूण 35 विद्यार्थी आणि कर्मचारी होते. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारकरून घरी पाठविण्यात आले आहे. तर जखमींना पहिल्यांदा कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर भंडारा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
कोंढा येथील नर्सरी ते आठवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या मदर टेरेसा पब्लिक स्कुलची बस क्रमांक (एम एच-36 एफ 3031)बस 35 विद्यार्थी व चार कर्मचारी यांना घेऊन घरी सोडण्याकरिता जात होती. दरम्यान, चालक भैयालाल काटेखाये याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस झाडाला आदळली. त्यानंतर उलटी होऊन बस शेतात जाऊन पडली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्व मुलांना आणि कर्मचाऱ्यांना त्वरित बसमधून बाहेर काढले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे नेण्यात आले. आर्यन हुमणे (13 वर्ष), मयूर उपरीकर (11 वर्ष), मानसी चिचमलकर (4 वर्ष) याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. तसेच कर्मचारी सुषमा नंदागवळी ( वय 26), प्रतिभा गोसेकर (वय32), संध्या गिरडकर (वय 28) व रमेश जांगळे (शिक्षक वय45) यांना देखील किरकोळ मार लागल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली.