भंडारा - मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर अवैध विक्री करणारे ६ वाळुचे ट्रक आणि ७ वाळू तस्करांना अटक करण्यात आले आहे. जिल्हा खनिकर्म विभाग आणि पोलीस पथकाने ही कारवाई केली. चार दिवसांपूर्वीच वाळू तस्करांनी दोन महसूल कर्मचाऱ्यांना लाज लुचपत विभागाकरवी अटक करवली होती. ही कारवाई त्याचा बदला घेण्यासाठी केल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
अटक करण्यात आलेल्या तस्कारांकडून १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बहुतांश ट्रक चालक अमरावती जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. जप्त करण्यात आलेले ट्रक भंडारा पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. महसूल आणि पोलीस पथकाला याची माहिती मिळताच ते या ठिकाणी दाखल झाले. यावेळी पोकलेनच्या सहाय्याने ट्रक भरले जात होते. येथून शहाजाद खान, कलीम खा, उज्वल मेश्राम, अशफाक शेख, फाहरुख सय्यद, फारुख खान यांना अटक करण्याता आली. त्यांच्याकडून ६ ट्रकमध्ये असणारी २४५ ब्रास वाळू जिची किंमत ७ लाख ३५ हजार आहे जप्त केली गेली.
वैनगंगा नदीच्या अलीकडेच्या तीरावर रोहा घाट तर पलीकडे मुंढरी घाट आहे. विशेष म्हणजे पलीकडील भागात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवले आहेत, शेकडो ब्रास रेती शेतामध्ये आहे. यात डंपिंग केलेल्या रेतीची रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते. नागपूरसह विदर्भात ही रेती पाठविली जात आहे. या घाटावर अद्यापर्यंत कुणीही कारवाई केली नाही. तस्करी करणाऱ्या वाहनांच्या दररोज रांगा दिसत आहेत. अशीच अवस्था कन्हाळगाव व ढीवरवाडा घाटावरही आहे.