भंडारा - पवनी तालुक्यात अवैध वाळू वाहून नेणाऱ्या टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या जीवघेण्या हल्ल्यात सर्व अधिकार आणि कर्मचारी थोडक्यात बचावले आहे. टिप्पर चालक आणि मालक सध्या फरार असून त्यांच्या विरोधात पवनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.
आज पहाटे ४ वाजताच्या दरम्यान ८ टिप्पर गुडेगाव रेती घाटावरून अवैधरित्या वाळू भरून सावरला-गोंडीशिवनाळा-कन्हाळगाव-कांपा मार्गे जात आहे, अशी माहिती तहसीलदार गजानन कोकड्डे यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे कोकड्डे यांनी मंडळ अधिकारी दिलीप कावठे, तलाठी रणजित सव्वालाखे, तातोबा पाटील यांना सोबत घेऊन घटनास्थळाकडे कूच केले. दरम्यान तहसीलदार कोकड्डे व त्यांच्या पथकाला निलज येथील संजीवनी धाब्याजवळ टिप्पर क्र. (एम. एच. ४० बीएल ८५७४) व टिप्पर क्र. (एम. एच. ४९ ए. टी. ८५७५) या दोन टिप्पर ना थांबविण्यास यश मिळाले. दोन्ही टिप्परवर कार्यवाही करण्याकरिता तलाठीला टिप्पर चालकाला पवनीकडे घेऊन जाण्यास सागण्यात आले. त्याचवेळेस घटनास्थळी स्कॉर्पिओ क्र. (एम.एच ४०, ८५७५) येऊन थांबली व गाडीतून कलाम खान व रबूल खान हे दोघे उतरून 'कल्लू की गाडी को छोडो' असे म्हणत तहसीलदार यांच्याशी भांडण करायला सुरुवात केली.
संधीचा फायदा घेत टिप्पर क्र. (एम.एच ४९ ए.टी ८५७५) च्या चालकाने नागपूरकडे पळ काढला यावेळी टिप्परच्या हुकला पकडून कलाम खान सुद्धा निघून गेला. क्षणाचाही विलंब न करता तहसीलदारांनी आपल्या खासगी वाहनासह टिप्परचा पाठलाग केला. दरम्यान तहसीलदार यांनी भिवापूर येथील मरू नदीच्या पुलावर टिप्पर समोर गाडी थांबवली. या वेळी चालकाने टिप्परमधून तलाठी सव्वालाखे यांना खाली उतरवले व समोर उभ्या असलेल्या तहसीलदार यांच्या गाडीला धडक दिली व नागपूरकडे पसार झाला. याच संधीचा फायदा घेत दुसरा टिप्पर चालकही टिप्पर घेऊन पसार झाला. पवनी हद्दीतील निलज परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा गुन्हा घडल्यामुळे पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वीच पोलीस अधीक्षक यांनी लग्नाच्या वऱ्हाडीचा देखावा करत याच परिसरात मोठी कारवाई केली होती. मात्र, मंगळवारी अवैध वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यामुळे वाळू माफियांना कोणाचीही भीती नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी वाहतूक सुरू आहे. मग असे असतनाही अवैध वाळूची वाहतूक राजरोसपणे कशी सुरू आहे. खरच अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळणे एवढे कठीण आहे का, असे प्रश्न सर्व सामान्य नागरिकांकडून विचारल्या जात आहे.
हेही वाचा- कोरोना व्हायरस: भंडाऱ्यातील 'त्या' महिलेचा दुसरा अहवाल निगेटिव्ह...