भंडारा - जिल्ह्यात विविध आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केली गेली. मात्र, अद्याप खरेदी केलेल्या धानाची 107 कोटी रुपये थकबाकी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र, अनेक केंद्रात अद्याप विक्रीसाठी आणलेले धान तसेच पडून आहेत. 31 मार्च ही खरेदी करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
हेही वाचा... 'इथं' मृत्यूनंतरही मरणयातनाच, बालकांचा दफनविधी कचऱ्यात!
जिल्ह्यात 84 केंद्रांवर नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात आले. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात 20 लाख 83 हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले आहे. सर्वसाधारण ग्रेडचा 20 लाख 40 हजार 501 क्विंटल आणि अ ग्रेड चा 42 हजार 545 क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. याची आधारभूत दराने किंमत 378 कोटी 58 लाख रुपये आहे. यापैकी 270 कोटी 48 लाख 70 हजार 192 रुपये परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. तरीही 107 कोटी 95 लाख 93 हजार रुपयांची थकबाकी आहे. मात्र, शासनाने अद्यापही वाढीव दर व बोनस नुसार शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत आहेत.
शासनाने सर्वसाधारण धानाला आधारभूत किंमत 1815 रुपये, तर अ ग्रेड धानाला 1835 रुपये दर घोषित केला आहे. यासोबत धानाला प्रतिक्विंटल 500 रुपये बोनस व 200 रुपये प्रोत्साहन, असे एकूण 700 रुपये वाढीव दर जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात यापैकी शेतकऱ्यांना अद्याप कोणतीच रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शासनावर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत, असेच म्हणावे लागेल. ही वाढीव रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. त्यातच खरेदी बंद होण्याची तारीखही जवळ आल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे धान अजूनही खरेदी केंद्रावर खरेदी केले गेले नाही, त्यांना धान खरेदी केले जाईल की नाही, याची चिंता आहे.
हेही वाचा... 'कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्याचे पवारांकडून आदेश - नवाब मलिक
शासकीय तांदळाचे गोदाम जेवढ्या झपाट्याने खाली होतील, तेवढ्याच झपाट्याने आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान भरडाईसाठी उचलले जातील. भरडाईसाठी उचलले गेल्यास नवीन खरेदी होऊ शकेल. तसेच शेतकऱ्यांचे उरलेली रक्कम शासनाने जमा केल्यास आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर ते पैसे जमा करू, असे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले.