भंडारा - येत्या ११ एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपच्या खुशाल बोपचे आणि राजेंद्र पटले यांनी बंडखोरी करत अर्ज भरले होते. आज माजी खासदार खुशाल बोपचे यांनी नामांकण अर्ज परत घेतला. मात्र, राजेंद्र पटले यांनी अर्ज मागे न घेता आपण निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पटले यांच्या उमेदवारीमुळे भाजप फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
राजेंद्र पटले हे किसान मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत. राजेंद्र पटले यांनी किसान मोर्चा ची स्थापना केली होती. यातून त्यांनी संघटन निर्माण केले आहे. शिवाय ते ज्या समाजातून येतात त्यांची संख्याही मतदार संघात निर्णायक आहे. त्यामुळे आता निवडणूक भाजप, राष्ट्रवादी, बसप आणि राजेंद्र पटले यांचात होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
डॉ. खुशाल बोपचे यांनी आज भाजपच्या जिल्हाध्यक्षांसोबत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी अर्ज परत घेतल्याचे जाहीर केले. पक्षांनी बराच वेळा आपल्याला उमेदवारी अर्ज न देता इतरांना दिल्याने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोन आल्यावर पक्षाच्या बाबतीत विचार करत राष्ट्रहित पुढे ठेवून मी माझा उमेदवारी अर्ज परत घेतला. असे बोपचे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महत्वाचे म्हणजे पत्रकार परिषदेत बोलत असताना बोपचे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या उमेदवाराचे नाव ही आठवत नव्हते. यावरून भाजपमध्ये काय परिस्थिती आहे हे लक्षात येते.
तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज कायम ठेवणाऱ्या राजेंद्र पटले यांनी नेहमीच उमेदवारीची तिकीट मिळविण्यासाठी पक्षांतर केल्याचा त्यांचा इतिहास आहे. शासकीय नोकरीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमधये प्रवेश केला होता. त्यानंतर मागील विधानसभा निवडणूकीत त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी ते पुन्हा भाजपात आले होते. आता भाजपने तिकीट नाकारल्यावर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत.
सत्ता मिळावी म्हणून सतत पक्ष बदलत असल्यामुळे त्यांच्यावरही विश्वासार्हता किती ठेवावी असा प्रश्न मतदार विचारत आहेत. मात्र एवढे निश्चित की त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपवर नाराज असलेले कार्यकर्ते, किसान मोर्चाकडून जोडण्यात आलेले लोक सोबतच पवार समाजाच्या लोकांच्या मतांचा फटाक भाजपला बसू शकतो. मी एक छोटा कार्यकर्ता असून शेतकऱ्यांशी जोडलेला असल्याने आणि त्यांच्यासाठी वेळोवेळी आंदोलन केले आहेत. याचा मला फायदा होणार आहे. लोक मला निवडून देतील आणि दिल्लीला पाठवतील, असा विश्वास राजेंद्र पटले यांनी यावेळी दाखविला आहे.
नामांकन अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले. ११ एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्य लढत ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी असली तरी अपक्ष बंडखोर उमेदवार राजेंद्र पटले, बसपचे विजय नंदुरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कारू नान्हे यांच्यामुळे निवडणुकीत अधिकच रंग भरला आहे