भंडारा - प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला डिसेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी तीन दिवस लिलाव प्रक्रिया पार पडली. लिलावात 12 संघांनी खेळाडूंवर बोली लावली. यात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील आकाश पिकलमुंडे याच्यावर बंगाल वॉरियर्सने 17 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे. यामुळे मोहाडी परिसरातील क्रीडा प्रेमीतून आनंद व्यक्त होत आहे.
लिलावाआधी 59 खेळाडूंना संघांनी रिटेन केले होते. तसेच 161 खेळाडूंना रिलीज केले होते. लिलावात काही खेळाडूंवर मोठी बोली लागली. प्रदिप नरवाल (1.65 करोड) आणि सिद्धार्थ देसाई (1.30 करोड) यांच्यावर एक करोडहून अधिक रुपयांची बोली लागली. यात भंडाऱ्याचा आकाश पिकलमुंडे यांच्यावर बंगाल वॉरियर्स या संघाने 17 लाखांची बोली लावली. आकाशची बेस प्राईज ही 10 लाख रुपये होती.
वडिलांच्या मार्गदर्शनात आकाश पिकलमुंडेने गिरवले कबड्डीचे धडे -
आकाशला शालेय जीवनापासून कबड्डीची आवड आहे. तसेच आकाशचे वडिल नथू पिकलमुंडे हे देखील कबड्डीचे नावाजलेले खेळाडू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आकाशने कबड्डीचे धडे गिरवले. आकाशने शालेय ते महाविद्यालयीन गटात राष्ट्रीय स्तरापर्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. भारत पेट्रोलियम, मुंबई कबड्डी टीम यांच्याकडून खेळणारा आकाश सध्या एअर इंडिया सोबत करारबद्ध आहे. तो उत्कृष्ट चढाईपटू म्हणून ओळखला जातो.
आकाश पिकलमुंडे भंडारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू -
आकाश पिकलमुंडे याचा क गटात समावेश होता. त्याची बेस प्राईज ही 10 लाख इतकी होती. लिलावात जेव्हा त्याच्या नावावर बोली लावण्यात आली. तेव्हा यात अनेक संघांनी त्याच्यावर बोली लावली. अखेरीस बंगाल वॉरियर्सने सर्वाधिक 17 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले. प्रो कबड्डी लीगमध्ये बोली लागलेला आकाश भंडारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला.
प्रो कबड्डी लीगमध्ये बोली लागल्यानंतर काय म्हणाला आकाश पिकलमुंडे?
प्रो कबड्डी स्पर्धेत एखाद्या संघाकडून खेळण्याची संधी मिळावी, यासाठी 2016 पासून माझे प्रयत्न सुरू होते. चांगल्यात चांगला खेळ सादर करण्यावर माझे विशेष लक्ष होते. अखेर आज हे स्वप्न पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेत या पटांगणावर मला सोबत घेऊन खेळणाऱ्या विद्युत मंडळ क्लबच्या प्रत्येक सहकाऱ्याचा मी ऋणी आहे. तसेच माझे पाहिले गुरू माझे वडील, आणि त्यानंतर प्रत्येक वेळी विविध ठिकाणी लाभलेल्या मार्गदर्शकांचे देखील मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आकाश पिकलमुंडे याने लिलावानंतर दिली.
बंगाल वॉरियर्सचा संघ -
मनिंदर सिंह, रिंकू नरवाल, मोहम्मद इस्माईल नबी बक्श, रविंद्र रमेश कुमावत, सुकेश हेगडे, अबोजर मिघानी, सुमित सिंह, मनोज गौडा, विजिन थंगादुरई, परवीन, रोहित बन्ने, दर्शन जे, सचिन विट्टला, आकाश पिकलमुंडे, रोहित आणि रिशांक देवाडिगा.
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताच्या सिंघराज अदानाने शुटिंगमध्ये जिंकलं कास्य पदक
हेही वाचा - Tokyo Paralympics: भगत-पलक मिश्र दुहेरी जोडीचा पहिल्या सामन्यात पराभव