भंडारा - देशात सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण म्हणजेच दिवाळीसाठी नागरिक सज्ज झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठाही सजल्या आहेत. आकाशदिवे, पणत्या, रांगोळी, लक्ष्मीच्या मुर्त्या आणि झेंडूची फुले खरदे करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
दिवाळी सण हा आनंदाचा आणि उत्साहाचा असल्यामुळे दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवसापासून नागरिक विविध वस्तूंची खरेदी करतात. लक्ष्मीपूजनसाठी नवीन कपडे, घरांवर सजविण्यासाठी आकाशदिवे, अंगणात काढण्यासाठी विविध रंगांच्या रांगोळी आणि सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्यासाठी मातीच्या पणत्या अशा अनेक वस्तू बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिठाई आणि फटाक्यांची खरेदी करण्यासासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे. यासाठीच सुरक्षेच्या दृष्टीने भंडारा शहरात फटाके विक्रीसाठी दसरा मैदानात विशेष व्यवस्था केली गेली आहे.
हा उत्साहाचा सण साजरा करण्यासठी कामानिमित्ताने बाहेर गावी राहाणारे अनेकजण गावी परत येतात, त्यामुळे बसेसमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या मंदी मुले आणि ऑनलाईन व्यापारामुळे उद्योगांवर मोठे संकट ओढवले आहे. मात्र, दिवाळीमुळे काही प्रमाणात का होईना सगळ्या व्यवसायाचे चांगले दिवस येतात. त्यामुळे या सणाची नागरिकांसोबतच व्यावसायिकही आतुरतेने वाट पाहात असतात.