भंडारा - भाजपची आणि भाजप समर्पित लोकांची सत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आहे. ती सत्ता उलथून पाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्याचाच परिणाम जिल्ह्यातही पाहायला मिळत असून पवनी नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आला आहे. तर, साकोली आणि भंडारा येथील नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू आहे. सत्ताधारी लोकांनी सत्तेच्या लालसेपोटी सुरू केलेले हे अतिशय निकृष्ट राजकारण असल्याचा आरोप जिल्ह्याचे खासदार आणि नगराध्यक्ष सुनील मेंढे तसेच पवनी नगराध्यक्ष यांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने एक नवीन अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष आता जनतेतून नाही तर नगरसेवकांमधूनच निवडला जाईल. हा आदेश महाविकास आघाडीने मुद्दाम काढला की आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील विरोधकांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारली हे सांगणे कठीण आहे. मात्र, भाजप आणि भाजप समर्थित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानमध्ये नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील भाजप समर्थित नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. आता नगराध्यक्षांवर पूर्वीप्रमाणे अविश्वास ठराव आणून पाय उतार करता येत नाही. त्यामुळे ज्या नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला जातो त्याची चौकशी जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत करून त्याचा अहवाल शासनाला पाठविला जातो. त्यानंतरच अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला की बारगळला ते ठरते.
पवनीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्तावाची चौकशी सुरू असतांनाच साकोली नगरपंचायतीमध्ये सुद्धा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी नगरसेवकांनी सुरू केली आहे. तर, भंडारा नगरपालिकेमध्येही बंडखोरीचे ग्रहण लागले असून इथेही नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे साकोली आणि भंडारा या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मागील ३ वर्षांपासून या तिन्ही नगरपालिकेमध्ये सर्वकाही आलबेल सुरू असताना महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलानंतर अचानक अविश्वास प्रस्तावाची लागण होणे, हा केवळ योगायोग म्हणावं का. महाराष्ट्रात सत्ता मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेवर ही सत्ता मिळविण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे हे कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.
हेही वाचा - भाजप नगराध्यक्ष, नगरसेवकांनी एकमेकांवर लावले भ्रष्टाचाराचे आरोप
पवनी नगराध्यक्षांवर लावलेले सर्व आरोप खोटे असून मुख्याधिकारी यांनी सत्ताधारी नेत्यांच्या दबावात येऊन खोटी माहिती दिल्यामुळे हा घोळ झालेला आहे. त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी नगर विकास आघाडीचे संस्थापक विलास काटेखाये यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीकडे कोणत्याही विकास कामाचे नियोजन नाही. केवळ सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खोट्या आरोप-प्रत्यारोपांच्या नावावर कुरघोडीचे राजकारण करीत आहेत. इतकेतच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीचे चुकीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजप खासदार तथा भंडारा नगरपालिका नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी केला आहे.
हेही वाचा - रस्त्यासह संरक्षण भिंतही गेली चोरीला; पवनी नगरसेवकांचा नगराध्यक्षांवर आरोप