भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकडोंगरी वनविभागात वाघाची शिकार करून त्याचे अवयव विकणाऱ्या 2 शिकऱ्याना वनविभागाच्या संयुक्त टीमने अटक केली आहे. गोबरवाही येथे दुचाकीवरून वाघाचे अवयव विक्रीसाठी नेणाऱ्या 2 शिकाऱ्यांना वनाधिकाऱ्यांच्या टीमने शनिवारी 19 नोव्हेंबर रोजी पकडले. संजय श्रीराम पुषप्तोडे (44), रा. पवणारखारी, रामू जयदेव ऊईके (33) रा. चिखला अशी या 2 अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाघनखे, सुळेदात आणि हाडे जप्त करण्यात आली आहेत.
बनावट ग्राहक बनून रचला सापळा: तुमसर तालुक्यात वाघाच्या अवयवाची तस्करी होत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. वाघाच्या अवयवांची विक्री करण्यासाठी वनाधिकारीच बनावट ग्राहक बनून शिकाऱ्यांशी संपर्क केले. दोन दिवस शिकाऱ्यांसोबत बनावट ग्राहक बनून वनाधिकाऱ्यांची चर्चा सुरु होती. अखेर शनिवारी व्यवहाराचा निश्चित झाला. गोबरवाही येथे हे दोन्ही आरोपी दुचाकीवरून पोहचले. शिकाऱ्यानी त्यांच्या कडील पिशवीमधील वाघाचे अवयव दाखवताच वनाधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 15 वाघ नखे, 3 सुळे दात, 10 दातांच्या जोडी, हाडे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.
संयुक्त पथकाने ही कार्यवाही: आरोपी संजय श्रीराम पुष्पतोडे, रामू जयदेव ऊईके यांना वाघाची शिकार आणि त्यांच्या अवयवाची विक्री करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. ही संपूर्ण कार्यवाही दक्षता विभाग, वनविभाग नागपूर, फिरते पथक भंडारा तसेच नाकाडोगरी वनक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने ही कार्यवाही पूर्ण केली आहे. या आरोपीला अटक केल्यानंतर या यांनी अगोदरही वाघाची शिकार करून त्याचे अवयव विकले का ? यांच्या टोळीत अजूनही आरोपींचा समावेश आहे का ? याचा तपास वनविभागाचे कर्मचारी सध्या घेत आहेत.