भंडारा - हलक्या तसेच भारी धानाची पेरणी केलेले अनेक शेतकरी सुरुवातीच्या अपुऱ्या पावसाअभावी आधीच वैतागले होते. मात्र, खरीप हंगामात मध्यंतरी पडलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा धक्का दिला आहे. लाखांदुर तालुक्यात अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात धान पिकाची पेरणी केली जाते. येथे रविवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापलेला धान पाण्यात भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी नुकसानभरपाई देण्याची मागणी करीत आहेत.
या वर्षीही पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस आणले आहे. पाऊस सुरुवातीला आला आणि अचानक गायब झाला. त्यानंतर 25 दिवसाने पुन्हा बरसला त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. बऱ्याच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीला आले, तर काही शेतकऱ्यांनी हे धान कापून शेतात ठेवले होते. मात्र, रविवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे या कापलेला धानाच्या पेंड्या पावसात चांगल्याच भिजल्या. या भिजलेल्या धानाला आता बाजारात दार मिळणार नाही त्यामुळे शेतकरी आता प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.
हेही वाचा - दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
गेल्या २ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे पिकांवर कीड लागण्याची शक्यता वाढली आहे. मध्यंतरी तुडतुडा व अन्य कीड रोगाने शेतकरी पुरता हतबल झाला होता. यातच आलेल्या पिकांवर परतणाऱ्या पावसाने अचानक आगमन केले. यामुळे शेतकऱ्यांनी कापलेले धानपीक बुडाल्याने अवघे शेतकरी हतबल ठरले आहे.
याप्रकरणी कृषी विभागासह प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बुडीत शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी जनतेने केली आहे.
हेही वाचा - भंडारा-गोंदिया भाजप मुक्त; लोकसभेत दोन लाखांचे मताधिक्य तर विधानसभेत दारुण पराभव