भंडारा: महाराष्ट्रमध्ये आगामी 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय तयारी सुरू झाली आहे. त्यातच प्रत्येक पक्षातील मोठ्या नेत्यांची नावे मुख्यमंत्री म्हणून समोर येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही नाव आहे.
तरच मुख्यमंत्री व्हाल: नाना पटोले भंडारा जिल्ह्यात येणार असल्याने त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी 'भावी मुख्यमंत्री नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा स्वरूपाची फलकबाजी केली. त्यामुळे काँग्रेसच्या गटातील त्यांच्याच विरोधकांसाठी हा मोठा भूकंप आहे. विदर्भातील भाजप नेत्यांमध्येही हा विषय चर्चेचा ठरला. मुख्यमंत्री व्हायचे असेल तर पटोलेंनी महाविकास आघाडी सोडून जावे, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
यावर पटोले म्हणाले..: यावर नाना पटोले म्हणाले की, 'भावी मुख्यमंत्री'चे लावलेले फलक किंवा केक या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यांच्या भावनांचा मी आदर करतो; मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची सत्ता आणायची असेल तर काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. त्यानंतरच पक्षश्रेष्ठी ठरवेल त्याला मुख्यमंत्री करता येईल आणि त्या अनुषंगानेच प्रयत्न करा, असे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले.
भाजपवर टोलेबाजी: भाजपच्या मंत्र्यांनी या संपूर्ण विषयाकडे लक्ष न देता बेरोजगारी, महागाई व त्यांनी केलेल्या पापाकडे लक्ष द्यावे. कर्नाटकमध्ये भाजपला अपयश आले. त्याचप्रमाणे भविष्यातही महाराष्ट्रमध्येही त्यांना त्यांची सत्ता वाचवता येणार नाही. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमुळे भाजपला दुःख होत असेल तर मी त्यांच्या दु:खामध्ये सहभागी आहे, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली.
पूजेनंतर कापला केक: पाच तारखेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी रविवारी भंडारा जिल्ह्यातील चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळेस मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. पूजेनंतर कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्यासाठी एक मोठा केक आणला. त्यावर 'भावी मुख्यमंत्री नाना पटोले' असे नाव लिहिलेले होते. पटोलेंनीसुद्धा कार्यकर्त्यांचा मान राखत केक कापला आणि केक भरवून सर्वांचे अभिनंदन केले. उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावात लाडूतुला होणार आहे.
हेही वाचा: