भंडारा - कोरोनाबाधित रुग्णांना सलग 13 दिवस सेवा देऊन घरी परतलेल्या परिचारिकेचे परिसरातील लोकांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. भावना विजय आयलवार, असे या नर्सचे नाव आहे. या परिचारिका भंडारा शहरातील रामायण नगरीमध्ये वास्तव्यास आहेत. तर या स्टाफ नर्स म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यरत आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 खाटांच्या विशेष रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष रुग्णालयात भावना आयलावर यांनी 13 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत अविरतपणे आपल्या कर्तव्य पार पाडले. त्यानंतर त्या 27 एप्रिल ते 1 मेपर्यंत सेल्फ क्वॉरंटाईन होत्या. त्यानंतर त्या 1 मेला घरी परतल्या. त्यावेळी त्यांचे त्यांच्या शेजाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
यादरम्यान त्यांच्या 13 वर्षीय मुलीची काळजी त्यांच्या वडिलांनी घेतली. शुक्रवारी भावना घरी परत येणार याची माहिती त्या राहत असलेल्या इमारतीमधील नागरिकांना आणि परिसरातील लोकांना मिळाली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून सर्वांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव करून आणि टाळ्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केले. परिसरातील परिसरातील लोकांच्या या स्वागतामुळे भावना याही भावनिक झाल्या होत्या.