भंडारा - वटसावित्रीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात महिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा केली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या या सावित्रींना स्वतःची, मुलांची आणि समाजाच्या दीर्घायुष्याची विसर पडल्याचे चित्र शहरात दिसून आले. पूजा करण्यासाठी गेलेल्या या महिलांनी ना मास्क वापरले, ना सोशल डिस्टन्सिंग ठेवले. काही महिलांनी तर चक्क लहान मुलांना पूजेला सोबत नेले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात राम नवमी, ईद, आंबेडकर जयंती यासारख्या सामूहिक कार्यक्रमांवर बंदी आली. त्यामुळे नागरिक घरीच राहिले. तिसऱ्या लॉकडाऊननंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 40 वर पोहचली आहे. त्यातच आता बाजारपेठा खुल्या झाल्या, लोकांना बाहेर पडण्याची मुभा मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत.
घराबाहेर पडताना नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र बाहेर पडणार्या लोकांना या नियमांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास याचे फार गंभीर परिणाम येत्या काही दिवसात दिसून येतील.