भंडारा - लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले आहेत. पालकमंत्री केदार यांनी लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील अन्नधान्याची परिस्थिती काय आहे? मागणी किती आहे? तितका पुरवठा होत आहे की नाही? प्रत्येकाला शासनाच्या निर्देशानुसार धान्य मिळत आहे का? याबाबत जिल्ह्यातील सातही तहसील मध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.
विधवा, दिव्यांग, शेतमजूर आणि गरजूंना अन्नधान्याचा तातडीने पुरवठा करावा. कोणाचीही गैरसोय होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. पहिली बैठक ही तुमसर तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता घेण्यात आली. तर दिवसभर आढावा बैठक घेतल्यानंतर रात्री 9 वाजेला पवनी तालुक्यात शेवटची बैठक घेतली गेली. पालकमंत्री म्हणाले, शिधापत्रिका नसलेल्यांची पडताळणी करून त्यांची यादी करावी. तातडीने त्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून द्यावी. प्रामुख्याने विधवा, गरीब, शेतमजूर आणि दिव्यांग व्यक्तींना विशेष प्राधान्य देऊन अन्नधान्याची सोय करावी.
शेतकरी आणि शेतमजुरांना शेतीकामासाठी जाण्यासाठी अडवणूक करण्यात येऊ नये. पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात येऊ नये. खरीप शेतीचा हंगाम आलेला आहे, शेतकऱ्यांना कर्ज मागणीसाठी लागणारे स्टॅम्प आणि आवश्यक दस्तावेज याकरता फोटो स्टुडिओ, झेरॉक्सची दुकाने उघडण्याची मंजुरी देण्यात यावी, असे ते म्हणाले.
हेही वाचा - 'स्वावलंबी होण्याचा संदेश कोरोना महामारीने दिलाय'
कृषी उपयोगी साहित्य विक्रेता आणि भाजीपाला विक्रेत्यांना कोणतीही अडचण निर्माण होता कामा नये, याची दक्षता घ्यावी प्रशासनाने घ्यावी. एमआरईजीएस प्रस्तावित कामे मंजूर करण्यात येत आहेत. त्यासंबंधीची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित विभागाने युद्धस्तरावर पूर्ण कराव्या आणि मजुरांना रोजगार उपलब्ध होईल याकरिता प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. तेंदूपत्ता संकलनाचे 370 केंद्र आहेत. सर्वच्या सर्व केंद्र सुरू करण्याच्या सूचना त्यांनी वन विभागास दिल्या. या आढावा सभेत तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील परिस्थिती आणि उपाययोजना बद्दल सादरीकरण केले.