भंडारा - जिल्ह्यात पुन्हा ७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण एका छोट्याशा गावातील असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नवीन सातही रुग्ण साकोली तालुक्याच्या महालगावातील असून या गावाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर नाना पटोले यांचे सुकळी हे गाव बफरझोनमध्ये ठेवण्यात आले आहे.
सोमवारी आठ कोरोनाबाधित लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र मंगळवारी पुन्हा 7 बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे सातही लोक साकोली तालुक्यातील महालगाव येथील असून यापैकी एक तरुण हा मुंबईवरून 15 तारखेला गावात आला होता. त्यानंतर 17 तारखेला दोन तरुण पुण्यावरून तर दोन तरुण सोलापूरवरून आले होते. 18 तारखेला पुन्हा पुण्याहून दोन तरुण आले होते. या सर्व तरुणांना गावातील शाळेमध्ये क्वारंटाईन केले गेले होते.
या सात जणांचे घशाचे नमुने 30 तारखेला तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. मंगळवारी या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जेमतेम एक ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या महालगावात एकाच दिवशी 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य यंत्रणेने लगेच गावात जाऊन सर्व लोकांची तपासणी सुरू केली आहे. गावालगत असलेल्या सुकळी, सोनका आणि पळसगाव गावांना बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 38 पैकी 18 रुग्ण हे एकट्या साकोली तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 38 इतकी झाली आहे. यामध्ये रुग्ण 29 क्रियाशील आहेत. तर 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.