भंडारा - मागच्या वर्षी सरकारने केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना पाचशे रुपये बोनस मिळाले होते. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना सातशे रुपये बोनस मिळणार असून याविषयी लवकरच घोषणा होईल, असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. तसेच बिहारमध्ये राजकीय पक्षाच्या भूमिकेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही अनुचित परिणाम होणार नसून महा गटबंधन महाराष्ट्रापुरते असून हे पुढील पाच वर्ष अबाधित राहील, असे त्यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले.
आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना दरवर्षी हमीभाव आणि बोनस देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार मागच्या वर्षी अठराशे रुपये दर आणि सातशे रुपये बोनस शासनाने घोषित केले होते. चालू वर्षात जवळपास 1400 कोटी रुपये शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात मिळणार असून यातील 75 टक्के रक्कम ही भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरला बोनस स्वरूपात मिळणार आहे. राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पुरती केल्यानंतर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना हमीभाव म्हणून 2500 रुपये एकरी मिळायला हवे. मात्र, केंद्र शेतकऱ्यांना धानाचा खरा हमीभाव देत नसल्यामुळे केंद्र सरकारने ठरविलेल्या अठराशे रुपये हमी भावानुसार शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या अठराशे रुपयेसह सातशे रुपये महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात दिले जात आहेत. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना बोनसचे पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या बोनसचे पैसे त्यांना मिळवून दिले असून 2021 मध्येही शेतकऱ्यांना सातशे रुपये बोनस मिळावे यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच कॅबिनेटमध्ये तशी घोषणा होईल असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना धनाचे एवढे भाव देणारे भारतात केवळ छत्तीसगड आणि महाराष्ट्र्र हे दोनच राज्य आहेत असे ही त्यांनी सांगितले.
प्रफुल पटेल यांना यावेळेस बिहारच्या राजकारणाविषयी विचारले असता बिहारची राजकीय परिस्थिती वेगळी असून तिथे शिवसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतलेल्या वेगळ्या भुमिकेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडणार नसून महाराष्ट्रात असलेले महाआघाडीचे गटबंधन पुढील पाच वर्ष सुरळीत चालणार आहे. त्यामुळे इतरांनी त्याची चिंता करू नये, असे त्यांनी यावेळी सांगितले.