भंडारा - स्वप्न बघणे हा सर्वांचा अधिकार असून, काही लोकं दिवसा स्वप्न बघत असल्याचा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांना लगावला आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनेल या धनंजय मुंडे (Dhananjay Munde said Next CM from NCP) यांच्या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते. ते आज भंडारा येथे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात आले असता त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चा - पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी करून राजकीय क्षेत्रात एक नवीन खळबळ निर्माण केली आहे. सध्या राज्यसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत असून, मोठ्या प्रमाणत घोडेबाजार होणार आहे असे वक्तव्य सतत होताना दिसत आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भविष्यात नवीन समीकरण तर होणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नाना पटोलेंचा धनंजय मुंडेंना टोला - धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, काही लोकांना दिवसा स्वप्न पाहण्याची सवय आहे. सत्तेपासून दूर गेलेल्या बऱ्याच लोकांना हे स्वप्न सतत पडत आहेत. त्यातच आता सत्तेत असलेल्या लोकांनाही भर दिवसा उघड्या डोळ्यांनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न दिसत आहे. स्वप्न बघणे हे सर्वाचा अधिकार आहे. मात्र, लोकशाहीत मुख्यमंत्री कोण बनेल हे जनता ठरवत असते. काही लोकं दिवसा स्वप्न पाहात असतात, असा खोचक टोला नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.
नाना पटोलेंचा अजित पवारांना टोमणा - त्यांचाच उमेंदवार स्वत: गुजराती आहे, असे खोचक वक्तव्य नाना पटोले यांनी पुण्यातील अजित पवारांच्या भाषणावर केले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना, बाहेरचे लोक आपल्याला काय मदत करणार असे वक्तव्य केले होते. त्याबद्दल नाना पटोले यांना याबाबत विचारले असता, त्यांनी कोणत्या उद्देशाने बोलले मला माहित नाही. मात्र, त्यांचा स्वतःचा राज्यसभेचा उमेदवार गुजराती आहे. त्यामुळे त्यांचा एकदा उद्देश कळला की त्यांच्या वक्तव्यावर योग्य ते भाष्य करता येईल, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.