भंडारा - शहरात शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुण रिक्षा चालकाची लोखंडी रॉडने हत्या झाली आहे. सरफराज उर्फ बाबू कासम शेख (वय 18) असे मृताचे नाव आहे. सदर तरुण मेंढा परिसरातील रहिवासी होता. तर, या हत्तेनंतर आरोपीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
भंडारा शहराच्या नाईक कोटी परिसरात आज 12 वाजेच्या सुमारास आरोपी आणि मृतक यांच्यात भांडण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम बागडे (वय 20) आणि मृत सरफराज शेख हे दोघेही वेगवेगळ्या बाईकवर जात होते. यावेळी गाडीने कट मारल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. सुरुवातीला शाब्दिक भांडण आणि नंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत शुभम याने शेजारी सुरू असलेल्या बांधकामातील लोखंडी रॉड आणि पावडा घेऊन सरफराजवर हल्ला चढविला. या हल्ल्यात सरफराज याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी शुभम याने पोलीस स्टेशनमध्ये जात आत्मसमर्पण केले. हा प्रकार ज्याठिकाणी घडला ते ठिकाण पोलीस स्टेशनपासून 300 मीटर अंतरावर आहे. तसेच रस्ताही रहदारीचा आहे. त्यामुळे, घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हत्येसाठी वापरलेले हत्यार ताब्यात घेत पंचनामा केला. सोबतच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की भांडणातून याचा तपास पोलीस करीत आहेत.