भंडारा - मला उमेदवारी मिळू नये म्हणून माझ्यावर विनयभंगाचा खोटा आरोप करून परिणय फुके यांनी षडयंत्र रचले होते, असा सणसणीत आरोप आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. मात्र, हा आरोप करताना त्यांनी पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांच्या नावाचा आधार घेतला. मी निवडणुकीत माघार घेणार नाही, उलट मुख्यमंत्रीच त्यांचा अधिकृत उमेदवार परत घेऊन मला समर्थन करतील, अशी परिस्थिती आहे, असा दावा वाघमारे यांनी केला आहे.
मला विनयभंगाच्या आरोपात षडयंत्र करून फसविले गेले आहे, असे नेहमीच चरण वाघमारे म्हणायचे. मात्र, पहिल्यांदाच त्यांनी परिणय फुके यांचे उघडपणे नाव घेतले. मात्र, नाव घेत असतानाही त्यांनी कार्यकात्यांच्या नावाचा आधार घेतला. खोटारड्या पद्धतीने व्यवहार करणाऱ्या लोकांना मतदार त्यांची जागा दाखवतील असेही ते म्हणाले.
हेही वाचा - विनयभंगाचा गुन्हा म्हणजे, माझ्या विरोधात रचलेला कट - आ. वाघमारे
मी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी मागे घेणार नाही. कारण, काल (रविवारी) घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. त्यांना याविषयी विचारले असता त्यांनी मला उमेदवारी मागे न घेण्याचे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. त्यानंतर मी माझी उमेदवारी कायम ठेवण्याचे निश्चित केले असल्याचे त्यानी सांगितले.
हेही वाचा - मी जिल्ह्याचा पालकमंत्री, ही माझी कर्मभूमी, मग मी बाहेरचा कसा? - परिणय फुके
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बंडखोरांना २ दिवसांचा वेळ दिला आहे, असे विचारले असता आमदार चरण वाघमारे यांनी म्हटले कि, मुख्यमंत्री मला नाही तर त्यांच्या अधिकृत उमेदवाराला मागे घेण्यासाठी सांगतील. मला भाजपातर्फे समर्थन मिळेल, अशी परिस्थिती आज आहे. त्यांना एक-एक जागेची गरज आहे. त्यामुळे मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ते सांगणार नाहीत, असा आत्मविश्वास यावेळेस चरण वाघमारे यांनी दाखविला. आमदार चरण वाघमारे यांनी केलेल्या आरोपानंतर पक्षश्रेष्ठी त्यांची पक्षातून हकालपट्टी करतात की, त्यांच्या आत्मविश्वासानंतर त्यांच्या पाठीशी उभे राहतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा - राज्यमंत्री परिणय फुके, नाना पटोलेंचे शक्ती प्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल