भंडारा- जिल्ह्यातील दुग्धभुकटी प्रकल्प हा संपूर्ण विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मात्र, गेल्या दिड वर्षांपासून हा प्रकल्प बंद होता. काल या प्रकल्पाचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दूग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पुन:श्च शुभारंभ करण्यात आले. लॉक डाऊनच्या काळात या प्रकल्पाचा केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु, लॉकडाऊनच्या काळात दुधाचे खप खूप कमी झाले आहे. त्यामुळे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. दाभा येथील जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे दूग्धभुकटी केंद्र मागील दीड वर्षापासून बंद अवस्थेत होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही बाब पशुसंवर्धन व दूधविकास मंत्री सुनील केदार याच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण प्रकल्प काल पुन्हा सुरू करण्यात आला.
या प्रकल्पात जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील दूधही येणार आहे. एका दिवसात ७० हजार लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. सध्या ३० हजार लिटर दूधाचे भुकटीत रुपांतर केले जाणार आहे. पुढे दूधाची आवक वाढल्यास पूर्ण क्षमतेने हे प्रकल्प सुरू राहणार आहे. जिल्हा दूध उत्पादक संघ मागील काही वर्षांपासून तोट्यात आहे. या प्रकल्पामुळे दूध संघाला मजबुती मिळेल तसेच शेतकऱ्यांचे दूध वाया जाणार नाही. सरकार वेळीच दुधाची उचल करून त्याचे रुपांतर भुकटीत करणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन सारख्या या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एक चांगले स्त्रोत निर्माण झाले आहे.
हेही वाचा- भंडाऱ्यात मरकजवरून आलेले पुन्हा 11 नवीन लोक सापडले..